सांगली : आष्टा येथील नेताजी परिवारातील विद्यार्थी राज्यातील प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी संभाळत आहेत. संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘नेताजीयन्स’ कार्यरत असल्याचे आपण पाहतो. आता या नेताजी परिवारातील अभिमानास्पद क्षण पुन्हा एकदा सर्वांना अनुभवण्यास मिळाला असून, ‘नेताजी’ चे तिघेजणांची अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. सचिन ढोले, संजय आसवले आणि अमृत नाटेकर यांना शासनाने नुकतेच पदोन्नती देत पदस्थापनाही केली आहे. ज्येष्ठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व आष्टा येथील नेताजी परिवाराचे आधारस्तंभ अनिल फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील ही फळी तयार झाली आहे. याच परिवारातील वर्ष उंटवाल लड्डा यांची काही महिन्यापूर्वी आयएएस श्रेणीत निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारा पॅटर्न म्हणून आष्टा येथील पॅटर्न ओळखला जातो. त्यामुळे अगदी कठीण संघर्षातून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक तरुणांना प्रशासनात अधिकारीपदावर विराजमान करण्यात नेताजी परिवाराचा मोठा वाटा आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल फाळके यांच्या कडक शिस्तीत घडलेले हे तरुण आता प्रशासनाचा कणा बनले आहेत.
उपजिल्हाधिकारी पदावर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सचिन ढोले, संजय आसवले आणि अमृत नाटेकर यांना पदोन्नतीने आता नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. यात नाटेकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई येथे, आसवले यांची अपर जिल्हाधिकारी अहेरी (गडचिरोली) येथे तर ढोले यांची अपर जिल्हाधिकारी मुंबई पश्चिम उपनगरे या पदावर नियुक्ती झाली आहे. पदोन्नती आणि नव्या जबाबदारीबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.