मंगळवेढा तहसीलदार सोमवार, बुधवारी व शुक्रवारी नागरिकांना भेटणार
मंगळवेढा : तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी १२ ते २ या वेळेत नागरिकांना भेटता येईल, अशी माहिती मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर पुढील उपाययोजना करता येणार आहेत.

आठवड्यातील तीन दिवस दुपारी १२ ते २ या वेळेत नागरिकांना भेटता येणार आहे. याशिवाय मंगळवार आणि गुरुवारी तालुका दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. ज्यात शेत रस्ता स्थळ पाहणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी, शाळांना भेट आणि तालुक्यातील औद्योगिक प्रकल्पांनाही भेटी देवून त्यांच्या अडीअडचणी पाहणार आहे. त्याचबरोबरच तालुका दौऱ्यावेळी ग्रामस्तरावरील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालयानाही भेटी देवून त्यांची पाहणी व अडचणी तपासून त्याचे निरसन करण्यात येणार असल्याचेही तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले. |