मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे नागरिकांना आवाहन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मतदान जागृतीसाठी शिराळा दौरा संपन्न
सांगली : उज्वल भारताच्या भविष्यासाठी आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कांदे, तालुका शिराळा येथील मतदारांना आवाहन केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने स्वीप मतदार जनजागृती अभियानाच्या अंतर्गत श्रीमती धोडमिसे या कांदे येथे बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील, तसेच पंचायत समितीचे अधिकारी ग्रामसेवक व महिला, नवमतदार, दिव्यांग मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शिराळा तालुक्यातील कांदे गावात भेट देऊन मतदान जनजागृतीसाठी मतदारांशी थेट संपर्क साधला. यावेळी त्यांनी भाजी-विक्रेते, दुकानदार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला मतदार, नव मतदार यांच्याशी संभाषण करून त्यांना 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करणेचे आवाहन केले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मतदान करणे हे सुदृढ लोकशाहीसाठी किती आवश्यक आहे हे मतदारांना पटवून दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कांदे गावाच्या भेटीवेळी जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मुलींची शाळा येथे स्वखर्चातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. कांदे गावात ठिकठिकाणी मतदान जनजागृतीसाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक आणि घंटागाडीवर लावण्यात आलेल्या जिंगल पाहून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या मतदार जनजागृतीसाठी ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील विविध तालुक्यातल्या गावात स्वतः जाऊन मतदारांशी संवाद साधून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी मतदान करावे यासाठी त्या प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून कांदे येथेही त्यांनी सर्व मतदारांशी संवाद साधून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.
बदलापूर येथील शालेय विद्यार्थीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मोहीम तृप्ती धोडमिसे यांनी हाती घेतली आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी स्वतःच्या खर्चातून कांदे येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला दहा सीसीटीव्हीचा संच भेट दिला होता. त्याचीही त्यांनी या दौऱ्या दरम्यान पाहणी केली. यावेळी नागरिकांनी तसेच विशेषता मुलींनी सीसीटीव्ही दिल्याबद्दल धोडमिसे यांचे आभार मानले.