संवाद यात्रेत प्रशासन प्रमुखांनी साधला मतदारांशी संवाद

0
31

मतदान करण्याचे केले आवाहन

सांगली :   जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगली शहरातील संजयनगर परिसरात व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कडेगाव येथे मतदारांशी संवाद साधून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदार जनजागृती करणे व मतदानाची टक्केवारी वाढवणे यासाठी जिल्हा स्वीप समिती यांच्याकडून संजयनगर सांगली परिसरात संवाद यात्रा आयोजित करण्यात आली. या संवाद यात्रेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, 282-सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, महानगरपालिकेच्या उपायुक्त विजया यादव, उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाचा स्टाफ, ग्रामपंचायत अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांना आवाहन पत्र देऊन मतदार यादीतील नाव तपासणे मतदान केंद्राची माहिती करून घेणे त्याचबरोबर मतदार हेल्पलाइन नंबर याबाबतची माहिती दिली. मतदारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर , अत्यावश्यक आरोग्य सुविधाची सोय करण्यात आल्या आहेत. मतदारांनी, निर्भयपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन केले.   यावेळी उपस्थित सर्वांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here