सांगली : साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी दसऱ्याचा उत्साह सांगली बाजारपेठेमध्ये शनिवारी दिसून आला. दिवसाची सुरुवात पावसाने झाली असली तरी नंतर पावसाने उघडीप दिल्याने ग्राहकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती.
गेले काही वर्षाप्रमाणे यावर्षीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच वाहन खरेदीला ग्राहकांनी विशेष पसंती दिली. ग्राहकांची मागणी लक्षात घेता विविध वितरकांनी व कंपन्यांनी ऑफर्स सुरू केल्या होत्या त्याचा ग्राहकांना फायदा झाला.
शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपासूनच सांगली सह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पहाटेच्या कार्यक्रमात अडथळा आला पण सकाळी सातच्या सुमारास पावसाने उघडीप घेतल्याने मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रम व दुर्गामाता मंडळाच्या कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित लावली.
दसऱ्यानिमित्त विविध कंपनीने ऑफर्स सुरू केल्याने व खरेदी केल्यास त्यावर भेटवस्तू देणार असल्याने ग्राहकांनी खरेदीस विशेष प्राधान्य दिले. यातही दुचाकी, चार चाकी व इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळाली.
सोने दरात वाढ झाली असलीतरीही सोने खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला.