बेळंकी : गेल्या महिन्यापासून बेळंकीसह परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळंकी, कदमवाडी आणि परिसरातील ज्या द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाले आहे, त्यांनी महसूल विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार बेळंकी व कदमवाडी येथील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे जे नुकसान झाले आहे. त्याबाबत विहित नमुन्यातील अर्ज भरून तो जमा करावयाचा आहे. या अर्जासोबत सातबारा उतारा, आठ अ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स देणे आवश्यक आहे.
बेळंकी आणि परिसरात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पाऊस आणि हजेरी लावली होती. याच दरम्यान या परिसरातील द्राक्ष हंगामात सुरुवात होत असल्याने या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. याबाबत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता महसूल विभागाच्यावतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत.