सुनील तटकरे यांचा जयंत पाटील यांना इशारा
मुंबई : २०१४ मध्ये निवडणुकीचा निकाल समोर यायच्या आधी आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मी देखील स्वत: त्या ठिकाणी होतो. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी मी , छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. मात्र, त्यावेळी जयंत पाटील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना काही गोष्टींची माहिती नसेल. २०१७ मध्ये आम्ही सत्तेतही सहभागी होणार होतो. तेव्हा जयंत पाटील यांना माहिती नव्हतं की, त्यांना कोणतं खातं मिळणार होतं. त्यामुळे त्यांनी आता टीका करण्यापेक्षा अशा प्रकारची वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. अन्यथा मला देखील अनेक गोष्टी माहिती आहेत. काहीही बोलून अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर मला देखील पक्षांतर्गत अनेक गोष्टी बोलता येतात, असा इशारा सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांना दिला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता . देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांना इशारा दिला आहे.