बेळंकी : यू.जी.सी एन. टी.ए. मार्फत ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या ‘नेट’ परीक्षेतही शिक्षणशास्त्र विषयातून योगिता रघुवीर अथणीकर यांनी यश संपादन केले आहे. सन 2009 मध्ये शिक्षण सेवेत आल्यापासून सुरुवातीला वाळवा तालुक्यात सात वर्षे व नंतर मिरज तालुक्यात त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. सध्या गेली सहा वर्षे जिल्हा परिषद शाळा नंबर २ आरग ता. मिरज. या शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. शिक्षण सेवेत रुजू झाल्यानंतर शिक्षणातील बदलत्या प्रवाहानुसार नवीन बदल समजावून घेऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी डी.एड नंतरही त्या पुढे शिकत राहिल्या.इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली या विद्यापीठातून सन 2016 मध्ये त्यांनी बी.एड ची पदवी मिळवली. टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम. एस.डब्ल्यू. व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम.एड. ची पदवी त्यांनी संपादन केली. सन 2020 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित ‘सेट’ परीक्षा ही त्या उत्तीर्ण आहेत. सध्या त्यांची शिक्षणशास्त्र विषयातून पुणे विद्यापीठातील राजगड ज्ञानपीठाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व संशोधन अभ्यास केंद्र, भोर जि. पुणे या अभ्यास केंद्रात शिक्षणशास्त्र विषयातून पीएच.डी सुरू आहे.’ नेट ‘ परीक्षेतील यशाबद्दल सौ. अथणीकर म्हणाल्या…की, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नोकरी करत असताना सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने, संघ भावनेने अध्यापन व मार्गदर्शन केल्यामुळे नवोदय, शिष्यवृत्ती, एन. एम. एम.एस. सारथी यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. आमच्या विद्यार्थिनींनी शाळा नंबर 2 आरग ला स्पर्धा परीक्षांमध्ये सांगली जिल्हाभर नावलौकिक मिळवून दिला आहे. विद्यार्थिनींना शिकविता शिकविता आपल्यालाही खूप काही शिकता येतं. बुद्धिमत्ता व गणित या विषयाचे अध्यापन करत असताना या विषयांची तयारी अधिक चांगली झाली. त्यामुळे नेट सारखी परीक्षा ही उत्तीर्ण होणे सोपे झाले.आपण एखादे निश्चित ध्येय ठरवून सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळवता येते. या यशामध्ये माझे विद्यार्थी, माझे कुटुंब, बेळंकीतील इरादा परिवाराचे सदस्य, सध्या सेवेत असलेले या परिवारातील अधिकारी, माझे सहकारी शिक्षक, मार्गदर्शक यांचा मोलाचा वाटा आहे. सौ. योगिता अथणीकर यांनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षकाची नोकरी सांभाळून, शाळेत प्रभावीपणे काम करत असताना स्वतःच्या शैक्षणिक वाटचालीत उच्च शिक्षणातील मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या शैक्षणिक वाटचालीत गटशिक्षणाधिकारी चिखलकी, उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे व अश्विनी भांबुरे , केंद्रप्रमुख हरिभाऊ गावडे,1 मुख्याध्यापक दिलीप मगदूम यांचे मार्गदर्शन लागले.