सांगली : दसरा-दिवाळी या कालावधीमध्ये ग्राहकांचा कल लक्षात घेवून अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाकडून अन्न पदार्थ तपासण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. सणासुदीच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने फराळांचे स्टॉल, मिठाईचे दुकाने, हॉटेल, किराणा दुकाने, अन्न पदार्थ विक्री करणारे स्टॉल अशा 52 अन्न आस्थापनांच्या तपासण्या करून एकुण 107 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. या कारवाई दरम्यान 16 लाख 54 हजार 220 रूपये किंमतीचा 9 हजार 917 किलोग्रॅम खाद्यतेलाचा साठा जप्त केला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) नि.सु.मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या मोहिमेत दुध व दुग्धजन्य पदार्थ मिठाई, तूप यांचे 17 नमुने, खाद्यतेलाचे 29 नमुने, रवा/मैदा/बेसन यांचे 26 नमुने तसेच इतर अन्न पदार्थ यांचे 35 असे एकूण 107 अन्न नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले आहेत. तसेच नाताळ व 31 डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर, बेकरी, मिठाईची दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी या आस्थापनांच्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडून तपासण्या करण्यात येणार आहेत. जिल्हाभर तपासण्या करुन विविध अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात येणार असून दोषींविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री. मसारे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.