
सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग अद्यापही सुरूच आहे. शनिवारीही जिल्हाभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सांगली शहरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पलूस, तासगाव तालुक्यातही दुपारच्या सुमारास पाऊस झाला. गेल्याच महिन्यात मान्सूनने राज्य आणि देशातून माघार घेेतली असलीतरी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. दिवाळीला अवघा आठवडभराचा कालावधी शिल्लक असलातरी अद्यापही पाऊस सुरूच असल्याने नागरिकांना अडचणी जाणवत आहेत. मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या द्राक्ष हंगामाला सुरूवात झाली आहे. या पावसाने द्राक्षघड कुजण्याची सर्वाधिक शक्यता आहे. अजून चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.